Thursday, 18 June 2015

७/१२ चा उतारा आपले बारा वाजवू शकतो

७/१२ चा उतारा आपले १२ वाजवू शकतो.

-     अॅड. किशोर लुल्‍ला, सांगली.

अलीकडे प्‍लॉट आणि जमीनीमध्‍ये गुंतवणूक करण्‍याची प्रवृत्‍ती दिवसेंदिवस वाढत आहे. बँकेचा व्‍याजाचा दर आणि सोन्‍याच्‍या दरातील सारखा चढ उतार यापेक्षा प्‍लॉट आणि जमिनीमधील गुंतवणूक जास्‍त सुरक्षित आहे, हे आता सर्वांना पटू लागले आहे. गेल्‍या ३० ते ४० वर्षातील अनुभव पाहता ज‍मिनीमधील गुंतवणूकीमधून वर्षाकाठी कमीत कमी २० % टक्‍के लाभ मिळतो असा सर्वांचा अनुभव आहे. आणखी एक फायदा म्‍हणजे प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यात अनेकवेळा काही अडचणींमुळे थोडया पैशांची गरज भासते. अशावेळी सोने विकून किंवा बँकेतील मुदत ठेव मोडून लगेच पैसे काढून वापरले जातात. पर्यायाने ते संपून जातात. परंतू जमीन विक्रीस थोडा वेळ लागत असल्‍याने ती ताबडतोब विकणे शक्‍य नसते. अशा वेळी ती व्‍यक्‍ती इतर काही तरी धडपड करून पैसे जमवून आलेली अडचण दूर करते आणि जमीन अगर प्‍लॉट हा शिल्‍लक राहतो. त्‍यामूळे भविष्‍यात त्‍याचे भरपूर पैसे होतात.
माझे असे कित्‍येक मित्र आहेत की ज्‍यांनी त्‍यांची मुले ८ ते १० वर्षाची असताना पाच पन्‍नास हजारात प्‍लॉट घेतला आणि योजून विसरून गेले. तोच प्‍लॉट त्‍यांना १५ वर्षानंतर त्‍यांच्‍या मुलांच्‍या लग्‍नाला किंवा शिक्षणासाठी उपयोगी पडला. त्‍यामुळे ज्‍यांना दीर्घकाळाच्‍या आणि सुरक्षित गुंतवणूकीचा विचार करावयाचा असेल त्‍यांने केव्‍हाही डोळे मिटून प्‍लॉट अगर जमिनीमध्‍ये गुंतवणूक करावी.
परंतू येथे एक सावधगिरी बाळगली पाहिजे. डोळे मिटून गुंतवणूक म्‍हणजे कशीही गुंतवणूक करु नये. काही ठराविक कागदपत्रे सुरुवातीसच पाहिल्‍याशिवाय अजिबात  व्‍यवहार करू नये. यामध्‍ये सर्वात फसवणारा कागद म्‍हणजे ७/१२ चा उतारा, की ज्‍यावर सर्वजण विश्‍वास ठेवतात. लग्‍नासाठी मुलगी  पाहताना आपण फक्‍त मुलीचा फोटो पाहून लग्‍न ठरवतो का ? तर नाही. आपण तिचे आई-वडील, भाऊ, बहीण, त्‍यांचे घराणे वगैरेचा व्‍यवस्थित अभ्‍यास केल्‍याशिवाय लग्‍न ठरवत नाही. असाच काहीसा प्रकार जमीन खरेदीबाबत असतो. जशी मुलगी ही समक्ष पहावीच लागते, तसेच ७/१२ च्‍या झेरॉक्‍स प्रतीऐवजी नव्‍यानेच काढलेला मुळ ७/१२ उतारा पहावा.
त्‍यासोबतच त्‍यावरील सर्व फेरफारचे उतारे वाचावेत, जमिनीचा मूळ मोजणी नकाशा तसेच गाव नकाशा मागून घ्‍यावा. जमिनीची मोजणी करून त्‍याच्‍या हद्दीचे दगड बसवून घ्‍यावेत. पेपरमध्‍ये जाहीर नोटीस दयावी. येथे जाहिरातीच्‍या खर्चाचा विचार न करता किमान २ प्रसिध्‍द वर्तमानपत्रामध्‍ये नोटीस दयावी. एखादया ज्‍येष्‍ठ वकीलाकडून सर्च रिपोर्ट आणि लिगल ओपिनियन मागवून घ्‍यावे.

एजंटमार्फत जरी व्‍यवहार करणार असला तरी प्रत्‍यक्ष बैठक ही मूळ मालकाशीच करावी. एक जरी व्‍यक्‍ती बाजारभावापेक्षा ब-यापैकी स्‍वस्‍त प्‍लॉट देत असेल तर तेथे धोका आहे हे जरूर समजावे. वर्षानूवर्षे शक्‍यतो गावातील नावाजलेल्‍या डेव्‍हलपर्समार्फत प्‍लॉट अगर जमीन खरेदी केल्‍यास वरील सर्व त्रास वाचतो आणि फसवणूक टळते.